प्रार्थना

न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं नापुनर्भवं । कामये दुःखतप्तानां‌ प्राणिनां आर्तिनाशनम्‌ ॥

न राज्य चाहूँ, न स्वर्ग चाहूँ और न चाहूँ मोक्ष, मैं तो चाहूँ, दुःखियों की पीडा होवै सभी खतम ।

नको राज्य, नको स्वर्ग, नको मोक्षही मला, दुःखितांच्या नष्ट व्हाव्या, आर्ती सार्‍या आजला.

I desire neither kingdom nor heaven nor liberation. I desire end of miseries for all the life on the earth.

२००९/०५/१५

आरोग्य आणि स्वस्थता यांचे निकष

आरोग्य म्हणजे मनुष्याची निरोगी, अविकृत, प्राकृत अवस्था. प्रकृती. कुपोषण, अतिसेवन, अजीर्ण, जंतूसंसर्ग, विकार, रोग, अपघात ह्यांमुळे आरोग्य धोक्यात येते. हीच विकृत अवस्था. विकृती.

प्रकृती सुदृढ असेल तर स्वस्थता आपसुकच येते. सुदृढ मनुष्य स्वस्थतेच्या निरनिराळ्या स्तरांवर राहू शकतो. निकोप जीवन जगू शकतो. मात्र असामान्य संकटास सामोरे जाण्याची त्याची प्रतिबंधात्मक आणि निवारणात्मक शक्ती स्वस्थतेवर ठरते. आणि स्वस्थता म्हणजे शारीरिकदृष्ट्या मनुष्याची कर्तबक्षमता, कार्यक्षमता, अन्नाचा ऊर्जेसाठी आणि ऊर्जेचा कामाकरता सक्षम वापर करण्याचे सामर्थ्य.

आरोग्यवान माणूस इष्टताप, इष्टचाप, सुडौल, नियमित-उदर आणि संवेदनक्षम असतो.
म्हणजे त्याच्या शरीराचे तापमान इष्ट तेच असते, त्याचा रक्तचाप (रक्तदाब) इष्ट तेवढाच असतो, बांधा डौलदार असतो, उदर नियमित असते आणि परिसरातील चराचरांची योग्य ती दखल घेण्याकरता तो पुरेसा संवेदनाक्षमही असतो. आता या शब्दांचा नेमका अर्थ काय आहे? ते पाहू या.

आरोग्याचे निकष

१. तापमानः सामान्यपणे माणसाचे शरीर ३७°C किंवा ९८.६°F तापमानावर असते. ताप जास्त वाढू देऊ नये. १०२°F च्या वर गेल्यास पट्ट्या ठेवाव्या. १०४°F च्या वर गेल्यास त्वरित वैद्यकीय मदत मिळवावी.

२. रक्तदाबः सामान्यतः १२०/८० असतो. म्हणजे हृदय शुद्ध रक्त शरीरात ढकलते त्यावेळी जो दाब वापरते तो दाब १२० मिलीमीटर पार्‍याच्या स्तंभाइतका असतो, तर अशुद्ध रक्त शरीरातून खेचून घेते तेव्हा वापरते ती ओढ ८० मिलीमीटर पार्‍याच्या स्तंभाइतकी असते.

३. शरीर-वस्तूमान निर्देशांक: माणसाच्या किलोग्रॅममधील वजनास, त्याच्या मीटरमध्ये व्यक्त केलेल्या उंचीच्या वर्गाने भागल्यावर येणारे गुणोत्तर. हे सामान्यत: १९ ते २४ असते. त्याहून कमी असल्यास माणूस कुपोषित सदरात मोडेल तर त्याहून जास्त असल्यास माणूस स्थूल स्तरात मोडेल.

४. कमर/नितंब गुणोत्तर: हे सामान्यत: ०.८५ च्या आसपास असते. ते १ हून जास्त असेल तर पोट सुटलेले असल्याचे दर्शवते. हे गुणोत्तर फारच कमी असल्यास कुपोषणाने पोट खपाटीला गेल्याचे दर्शवते.

५. संवेदनाक्षमः कुठल्याही उपाधी, व्याधी, विकार, विकृती, आजार, रोग यांनी संत्रस्त झालेला मनुष्य आजूबाजूच्या चराचराची पुरेशी दखल घेऊ शकत नाही. त्याला जर त्यांची पुरेशी दखल घेता येत असेल तर तो आरोग्यवान असण्याची शक्यता असते.

स्वस्थतेचे निकष

१. विश्रांत अवस्थेतला हृदयस्पंदनदर: आरामात विश्रांत अवस्थेत असतानाचा हृदयस्पंदनदर कमीतकमी असावा. पुरूषांत ७२ तर स्त्रियांत ८४ स्पंदने प्रतिमिनिट असा दर सामान्यत: असतो. विश्रांत अवस्थेतला हृदयस्पंदनदर कमीतकमी असणे चांगले.

२. कष्टानंतर ते थांबवताच लवकरात लवकर विश्रांत अवस्थेतला हृदयस्पंदनदर गाठण्याची क्षमता: काम केल्यावर अथवा व्यायामानंतर हृदयस्पंदनदर वाढतो. काम करणे थांबवताच अथवा व्यायाम बंद करताच तो पूर्वपदावरही येऊ लागतो. काम वा व्यायामाची तीव्रता, वेग अथवा ते करत राहण्याचा वेळ वाढतो तसतसा, जास्तीत जास्त हृदयस्पंदनदर गाठला जातो. (२२५-तुमचे वय)= अंतिम हृदयस्पंदनदर. काम वा व्यायामाची तीव्रता, गती वा अवधी एवढाच वाढवावा ज्यामुळे तुमचा हृदयस्पंदनदर, तुमच्या अंतिम हृदयस्पंदनदराच्या ९० टक्क्यांहून जास्त वाढणार नाही. मात्र त्या काम वा व्यायामा दरम्यानचा सर्वोच्च हृदयस्पंदनदर गाठल्यावर, काम वा व्यायाम थांबवताच, कमीत कमी किती काळात तुमचा हृदयस्पंदनदर आरामात विश्रांत अवस्थेत असतानाच्या हृदयस्पंदनदरापर्यंत परततो, तो काळ. तो कमी असावा. तो काळ जेवढा कमी तेवढेच तुम्ही जास्त स्वस्थ. म्हणजेच, कष्टानंतर ते थांबवताच लवकरात लवकर विश्रांत अवस्थेतला हृदयस्पंदनदर गाठण्याची क्षमता.

३. अंतिम हृदयस्पंदनदरावर पोहोचेपर्यंत करू शकाल ते जास्तीत जास्त काम: जास्त तीव्रतेचे, जास्तीत जास्त वेगाने, जास्तीत जास्त वेळ केलेले सोसेल तेवढे काम वा व्यायाम. ते जास्त असावेत. जेवढे तीव्र, गतीमान आणि दीर्घकाळ काम करू शकत असाल तेवढीच तुमची स्वस्थता चांगली. म्हणजेच, अंतिम हृदयस्पंदनदरावर पोहोचेपर्यंत करू शकाल ते जास्तीत जास्त तीव्रतेचे, जास्तीत जास्त गतीमान व जास्तीत जास्त काळ केलेले काम.

४. श्वसनक्षमता: पूर्ण श्वास छातीत भरून घेऊन स्तनाग्रांपाशी मोजलेला छातीचा घेर, उणा त्याच जागी मोजलेला संपूर्ण निश्वसनाचे वेळी छाती रिकामी असता मोजलेला घेर हा फरक, रिकाम्या छातीच्या घेराच्या टक्केवारीत व्यक्त केल्यास मिळणार आकडा म्हणजे श्वसनक्षमता. ही ऑलिंपिक्सपटूंसाठी १५ टक्के पर्यंत असते. तर हृदयरुग्णांची ती २.५ टक्क्यांपर्यंत खालावलेली असते. सामान्य माणसाची श्वसनक्षमता ५ ते १० टक्के असू शकते. प्राणायामाने, योगासने केल्याने वा व्यायामानेही ती वाढते. हे सारे करतांना त्याचा उद्देश श्वसनक्षमता वाढवण्याचाच असावा. थोड्या थोड्या कालावधीनंतर पुन्हा मोजून प्रगतीची खात्री करून घ्यावी.

५. श्वसनगतीः श्वास आणि उच्छवास यांचे एक आवर्तन असते. एका आवर्तनास लागणारा वेळ श्वसनगती ठरवतो. श्वसनगती वेगवती असणे अस्वस्थतेचे निदर्शक असते. सामान्य माणूस मिनिटास १० ते १५ आवर्तने या गतीने श्वासोच्छवास करतो. तर ऋषीमुनी मिनिटास ५-६ आवर्तने या गतीने श्वासोच्छवास करत असतात. जर आयुष्याचे श्वास पूर्वनिर्धारित असतील तर दीर्घ श्वसन/ मंद श्वसन दीर्घायुष्याप्रत नेत असणार ह्यात काय संशय!

यानुसार मापने करून आपापली व्यक्तीगत अवस्था नोंदवणे गरजेचे असते. म्हणजे मग भविष्यात पुन्हा केलेल्या त्याच निकषांच्या मापनाने, आपण पूर्वस्थितीपेक्षा उन्नत होत आहोत की अवनत, त्याचा अंदाज येतो. सुधारणेची गरज जाणवते. सुधारणेची दिशा कळते. तसेच त्यापश्चात केलेल्या भावी मापनांत, सुधारणेकरता केलेल्या प्रयत्नांचे यश स्पष्टपणे दिसू शकते.

म्हणूनच, आपल्या शरीराचे तापमान, रक्तचाप, शरीर-वस्तूमान निर्देशांक, कमर/नितंब गुणोत्तर आणि संवेदनाक्षमता यांबाबतची आपापली निरीक्षणे आजच नोंद करून ठेवा.

विश्रांत अवस्थेतला हृदयस्पंदनदर, कष्टानंतर ते थांबवताच लवकरात लवकर विश्रांत अवस्थेतला हृदयस्पंदनदर गाठण्याची क्षमता, अंतिम हृदयस्पंदनदरावर पोहोचेपर्यंत करू शकाल ते जास्तीत जास्त काम, श्वसनक्षमता आणि श्वसनगती यांचीही मापने नोंद करून ठेवा.

कशाकशात सुधारणेला वाव आहे त्याची दखल घ्या. प्रत्येक निकषाबाबत सुधार कसा घडवून आणायचा त्याबाबतचे उपाय पुढल्या लेखात पाहू.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: