प्रार्थना

न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं नापुनर्भवं । कामये दुःखतप्तानां‌ प्राणिनां आर्तिनाशनम्‌ ॥

न राज्य चाहूँ, न स्वर्ग चाहूँ और न चाहूँ मोक्ष, मैं तो चाहूँ, दुःखियों की पीडा होवै सभी खतम ।

नको राज्य, नको स्वर्ग, नको मोक्षही मला, दुःखितांच्या नष्ट व्हाव्या, आर्ती सार्‍या आजला.

I desire neither kingdom nor heaven nor liberation. I desire end of miseries for all the life on the earth.

२००९/११/२८

पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ४

समाधिननेन समस्तवासना ग्रन्थेर्विनाशोऽखिलकर्मनाशः |
अन्तर्बहि: सर्वत एव सर्वदा स्वरूपविस्फूर्तिरयत्नतः स्यात् || विवेक चूडामणि ३६४

या निर्विकल्प समाधीच्या योगाने, अंतःकरणांतील सर्व वासनारूप ग्रंथींचा नाश होतो आणि त्यापासून निर्माण होणार्‍या कर्माचा पूर्ण क्षय होतो. असे झाले म्हणजे, आत आणि बाहेर, दोन्ही प्रसंगी स्व-स्वरूपाचे स्फुरण सर्वदा प्रयत्न केल्यावाचून सहजपणे होऊ लागते.

॥ चतुर्थः कैवल्यपादः ॥

चवथा मोक्ष पाद सुरू होत आहे.

१. जन्मौषधिमन्त्रतपःसमाधिजाः सिद्धयः ।
विशिष्ट जन्म, दिव्य औषधी, भिन्न देवतांचे मंत्र, तपःसामर्थ्य आणि समाधी अशा पाचांपासून सिद्धी प्रकट होत असतात.
 
२. जात्यन्तरपरिणामः प्रकृत्यापूरात् ।
जीवांच्या सूक्ष्म देहाच्या आश्रयाने असलेला, एका जातीचा स्थूल देह जाऊन, दुसर्‍या जातीचा देह निर्माण होणे हा जात्यंतर परिणाम होय. हा जात्यंतर परिणाम त्या त्या विकृतींची पूर्णता प्रकृतीकडून केली जाते म्हणून घडून येत असतो.
 
३. निमित्तम् अप्रयोजकं प्रकृतीनां । वरणभेदस्तु ततः क्षेत्रिकवत् ।
क्षेत्रिक म्हणजे शेतकरी ज्याप्रमाणे आपल्या शेताला पाणी पोहोचण्याकरता, मध्यंतरींचे उंचवटे, धोंडे, इत्यादी प्रतिबंध असतील तेवढे दूर करतो - मग अधोमार्गाकडे वाहत जाण्याच्या प्रकृतीधर्मानुसार पाणी आपण होऊनच त्याच्या शेतात जाऊन पोहोचते. त्याचप्रमाणे प्रकृतीच्या परिणाम प्रवाहाला जे वरण म्हणजे जो प्रतिबंध असतो त्याचा भेद म्हणजे नाश धर्माधर्मादिकांमुळे होत असतो, ती निमित्ते प्रकृतीला प्रयोजक नसतात. (त्या निमित्तांनी प्रतिबंध तेवढे दूर होतात आणि प्रकृती आपल्या स्वभावानुसार जात्यंतर परिणाम घडवून आणते.)
 
४. निर्माणचित्तान्यस्मितामात्रात् ।
योग्याने भोगार्थ निर्माण केलेल्या भिन्न शरीरातील भिन्नपणे निर्माण झालेल्या चित्तांचा आपूर, त्या चित्तरूपी विकृतींची प्रकृती अशी जी योग्याच्या ठिकाणची अस्मिता तिच्यातूनच केवळ घडून येत असतो.
 
५. प्रवृत्तिभेदे प्रयोजकं चित्तम् एकम् अनेकेषाम् ।
योग्याने निर्माण केलेल्या अनेक शरीरांतील अनेक चित्तांच्या भिन्न भिन्न प्रवृत्तींना प्रयोजक म्हणजे प्रेरक असलेले चित्त एकच असते. (म्हणून त्या प्रेरक चित्ताच्या प्रेरणेला अनुसरून सर्व चित्तांचे व्यापार एकाच अभिप्रायानुसार चालतात आणि योग्यास अपेक्षित भोग घडतात.)

६. तत्र ध्यानजम् अनाशयम् ।
योग्याने निर्माण केलेल्या ह्या अनेक चित्तांस प्रेरक असलेले जे ध्यानज, म्हणजे ध्यानावस्थेमुळे सत्त्वगुणाने संपन्न झालेले मूळचे चित्त, ते अनाशय असते; म्हणजे इतर चित्तांद्वारा घडणार्‍या भोगरूप कर्मामुळे त्या ध्यानज चित्तावर विपाकास कारणीभूत होणारे कर्मसंस्कार घडत नाहीत असे ते असते.

७. कर्माशुक्लाकृष्णं योगिनः त्रिविधम् इतरेषाम् ।
काही कर्मांचे स्वरूप शुक्ल म्हणजे शुभ असते. इतर काही कर्मांचे स्वरूप कृष्ण म्हणजे अशुभ असते. तर काही कर्मे शुक्ल-कृष्ण म्हणजे शुभाशुभ अशी मिश्र स्वरूपाची असतात. योग्यांची कर्मे शुक्ल ही नसतात, कृष्ण ही नसतात आणि शुक्ल-कृष्ण ही नसतात. योगी जनांहून इतर प्राकृत जनांची कर्मे मात्र वरील तिन्ही प्रकारची असतात.
 
८. ततस्तद्विपाकानुगुणानाम् एवाभिव्यक्तिर्वासनानाम् ।
त्या कर्मांच्या योगाने जाती, आयुष्य आणि भोग असा जो विपाक निर्माण होतो त्याच्याशी जेवढ्या वासना अनुगुण असतील तेवढ्यांचीच अभिव्यक्ती होत असते. (म्हणजे तेवढ्या वासना प्रकट होतात आणि इतर वासना चित्तांत तशाच प्रसुप्त अवस्थेत राहतात.)

९. जातिदेशकालव्यवहितानाम् अप्यानन्तर्यं । स्मृतिसंस्कारयोः एकरूपत्वात् ।
सांप्रतच्या विपाकाला अनुगुण असलेल्या आणि व्यक्त होणार्‍या वासना आणि त्यांचे मूळचे संस्कार ह्या दोहोंच्या मध्ये अनेक देशांत आणि कालांत प्राप्त झालेल्या अनेक जन्मांचे व्यवधान असूनही नंतर त्या वासना प्रकट होतात. वासनांचे संस्कारच स्मृतीरूपाने उदित होत असतात, म्हणजे स्मृती आणि संस्कार ह्यांच्यात एकरूपता असते हे ते संस्कार स्मृतीरूपाने चित्तांत उदित होण्याला कारण असते.

१०. तासाम् अनादित्वं चाशिषो नित्यत्वात् ।
देहरूप जो मी त्याला मरण येऊ नये असे जे जीवमात्राला वाटत असते तोच महामोहरूपी आशी: होय. हा आशी: सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी नित्याचाच आहे म्हणजे तो अनादी आहे. इतर सर्व वासना त्याच्यावरच अवलंबून असल्याने त्याही अर्थात् त्याच्यासारख्या अनादी होत.

११. हेतुफलाश्रयालम्बनैः संगृहीतत्वाद् एषाम् अभावे तदभावः ।
अविद्यादी पाच क्लेश वासनांचे हेतू होत; जाती, आयुष्य आणि भोग ही त्या वासनांची फले होत; चित्त त्यांचे आश्रयस्थान होय आणि शब्दादिक विषय त्यांची आलंबने होत. ह्या चारांपासूनच वासनांचा संग्रह होत असतो म्हणून ह्या चारांचा अभाव होताच वासनांचाही अभाव सिद्ध होतो.
 
१२. अतीतानागतं स्वरूपतोऽस्त्यध्वभेदाद् धर्माणाम् ।
धर्माच्या ठिकाणी अतीत धर्म म्हणजे कार्य संपल्यामुळे जे उपशांत झाले आहेत असे धर्म, अनागत म्हणजे जे उद्बोधक सामग्री मिळताच व्यक्तावस्थेला येणार आहेत असे धर्म आणि उद्बोधक सामग्री मिळाल्यामुळे व्यक्त दशेस येऊन ज्यांची कार्ये चालू झाली आहेत ते वर्तमान धर्म, अशा रीतीचा अध्वभेद आहे, म्हणून मागील सूत्रांत सांगितलेल्या वासनांचा वर्तमान धर्माच्या दृष्टीने जरी अभाव असला तरी त्या अतीत व अनागत अशा अवस्थांत स्वरूपतः असतातच.

१३. ते व्यक्तसूक्ष्मा गुणात्मानः ।
वर्तमानावस्थेत असलेले धर्म व्यक्त होत आणि कार्य घडून आल्यामुळे शांत झालेले अतीत धर्म आणि उद्बोधक सामग्रीच्या अभावी ज्यांस व्यक्तावस्था प्राप्त  झालेली नाही ते अनागत धर्म, हे दोन्हीही सूक्ष्म धर्म होत. अशा प्रकारचे हे व्यक्त आणि सूक्ष्म धर्म, सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण आहेत. आत्मा म्हणजे स्वरूप ज्यांचे, असे आहेत. म्हणजे हे सर्व धर्म तत्त्वतः केवळ गुणस्वरूपच आहेत.

१४. परिणामैकत्वाद् वस्तुतत्त्वम् ।
तिन्ही गुणांचा परिणाम एकच होत असल्यामुळे एकच वस्तुतत्त्व सिद्ध होते.

१५. वस्तुसाम्ये चित्तभेदात् तयोर्विभक्तः पन्थाः ।
वस्तू एकच असली तरी त्या वस्तूचे ग्रहण करणारी चित्ते भिन्न असल्याने ती वस्तू आणि ग्रहण करणारे चित्त ह्या दोहोंचा मार्ग भिन्न असतो. म्हणजे वस्तू आपल्या मार्गाने परिणाम पावत असते तर चित्त आपल्या स्वतंत्र मार्गाने परिणाम पावत असते. वस्तू आणि चित्त ह्यांचे परिणामप्रवाह अगदी स्वतंत्र असून ते आपापल्या स्वतंत्र मार्गांनी चाललेले असतात.

१६. न चैकचित्ततन्त्रं वस्तु तद् अप्रमाणकं तदा किं स्यात् ।
कोणत्याही वस्तूचे अस्तित्त्व एक-चित्ततंत्र नसते, म्हणजे कोणाही एका चित्तावर ते अवलंबून नसते. जर ते त्या वस्तूला पाहणार्‍याच्या चित्तावर अवलंबून असेल तर ते चित्त जेव्हा दुसर्‍या वस्तूची प्रतीती घेत असते तेव्हा ही पहिली वस्तू अप्रमाणक होणार की काय? म्हणजे प्रत्यक्षादी प्रमाणांनी ती इतरांस ज्ञात होणार नाही की काय? तशी ती अप्रमाणक होत असल्याचा अनुभव कधीच येत नाही. ह्यावरून ती एक-चित्ततंत्र नसते हे उघडच आहे.

१७. तदुपरागापेक्षत्वात् चित्तस्य वस्तु ज्ञाताज्ञातम् ।
इंद्रियद्वारा चित्ताने बाह्य विषयाकार धारण करणे म्हणजे बाह्य विषयाला व्यापणे हा चित्ताचा त्या विषयांशी होणारा उपराग होय. वस्तूचे ज्ञान होण्याला चित्ताचा त्या वस्तूशी असा उपराग होण्याची अपेक्षा असते. असा उपराग झाला म्हणजे ती वस्तू ज्ञात होते, म्हणजे तिचे ज्ञान आपणांस होते. जोपर्यंत असा उपराग झालेला नसतो तोपर्यंत ती वस्तू अज्ञात असते म्हणजे तिचे ज्ञान आपल्याला होत नाही.

१८. सदा ज्ञाताश्चित्तवृत्तयस्तत्प्रभोः पुरुषस्यापरिणामित्वात् ।
चित्ताचा प्रभू म्हणजे स्वामी, पुरूष होय. तो अपरिणामी आहे म्हणजे चित ज्याप्रमाणे निरंतर परिणाम पावत असते त्याप्रमाणे परिणाम पावणारा तो नाही म्हणून त्याला मात्र चित्ताच्या वृत्ती सदोदित ज्ञात असतात.
 
१९. न तत् स्वाभासंदृश्यत्वात् ।
चित्ताच्या ठिकाणी दृश्यत्व आहे म्हणजे ते दुसर्‍याकडून पाहिले जात असते. अशाप्रकारे जे दुसर्‍यास दृश्य असते ते स्वाभास म्हणजे स्वतःचे प्रकाशक असत नाही, म्हणून ते व त्याच्या वृत्ती त्याच्याहून अन्य असलेल्या अपरिणामी द्रष्ट्याला सर्वदा ज्ञात होत असतात.
 
२०. एकसमये चोभयानवधारणम् ।
आणि एकाच वेळी चित्त स्वतःला आणि बाह्य पदार्थाला अनुभवू शकत नाही, म्हणून ज्या अर्थी एकाच वेळी बाह्य पदार्थ आणि चित्ताच्या वृत्ती ज्ञात होत असतात त्या अर्थी बाह्य वस्तू चित्ताला ज्ञात होत असतात आणि चित्तवृत्ती अपरिणामी जो द्रष्टा त्याला ज्ञात होत असतात हे सिद्ध होते.
 
२१. चित्तान्तरदृश्ये बुद्धिबुद्धेरतिप्रसङ्गः स्मृतिसंकरश्च ।
चित्तवृत्तींना जे ज्ञान होत असते ते  अपरिणामी असलेल्या द्रष्ट्याला होत नसून ते चित्तांतरदृश्य म्हणजे निराळ्याच चित्ताला दृष्य म्हणजे ज्ञात होत असते असे मानले तर त्या निराळ्या चित्ताला म्हणजे बुद्धीला पाहणारे असे तिसरे चित्त मानावे लागेलच व मग तिसर्‍याला पाहणारे चौथे, चौथ्याला पाहणारे पाचवे, अशा प्रकारचा अतिप्रसंग प्राप्त होतो, इतकेच नव्हे, तर ह्या अनेक चित्तांतून उत्पन्न होणार्‍या स्मृतींचा संकर म्हणजे गोंधळही होईल पण असे तर कधीच घडत नाही म्हणून चित्तवृत्तींना जाणणारा अपरिणामी पुरूषच होय.
 
२२. चितेरप्रतिसंक्रमायास्तदाकारापत्तौ स्वबुद्धिसंवेदनम् ।
चित्ति म्हणजे चेतन पुरूष हा नेहमीच अप्रतिसंक्रम असा आहे. प्रतिसंक्रम म्हणजे दुसर्‍याकडे जाणे. द्रष्टा अप्रतिसंक्रम आहे म्हणजे बुद्धी जशी इंद्रियद्वारा विषयाकडे जाऊन त्याला व्यापते त्याप्रमाणे चेतन द्रष्टा अपरिणामी असल्यामुळे तो बुद्धी ज्ञात व्हावी म्हणून तिच्याकडे प्रतिसंक्रांत होत नाही तर आपल्या ठिकाणीच तो सुप्रतिष्ठित असतो. तत्त्वतः तो असा असूनही बुद्धी जेव्हा वृत्तीरूपाने परिणाम पावत असते तेव्हा तो अविद्येमुळे तिच्या आकाराला प्राप्त झाल्यासारखा होत असतो आणि अविद्यानाशानंतर मग मी असज्जडदु:खात्मक देहादिक नसून मी सच्चिदानंदरूप आत्मा आहे असे वृत्त्यात्मकविशेषज्ञानरूप स्वसंवेदन होते आणि साक्षिभास्य बुद्धीसंवेदनही होते.
 
२३. द्रष्टृदृश्योपरक्तं चित्तं सर्वार्थम् ।
चेतन पुरूष हा द्रष्टा आणि बाह्य जगातील पदार्थजात हे दृश्य ह्या दोहोंशी चित्त उपरक्त होत असते म्हणजे तदाकारतेला प्राप्त होत असते, ह्यामुळे ते सर्वार्थ असते म्हणजे द्रष्टा, दर्शन व दृश्य ह्या सर्व अर्थांचे ग्रहण अशा चित्ताच्या योगाने होऊ शकते.
 
२४. तदसंख्येयवासनाचित्रम् अपि परार्थं संहत्यकारित्वात् ।
अनेक जड पदार्थांच्या संहतीमुळे म्हणजे एकत्र येण्याने काही कार्यनिष्पत्ती होणे हे त्या पदार्थाचे संहत्यकारित्व होय. ज्यांच्या ठिकाणी असे संहत्यकारित्व दिसून येते ते जड पदार्थ दुसर्‍या कोणाच्या तरी भोगाकरता असतात ही त्यांची परार्थता होय. चित्त आपल्या ठिकाणी असलेल्या असंख्य वासनांमुळे जरी अनेक आकारांस प्राप्त होणारे असले तरी त्याच्या ठिकाणीही संहत्यकारित्व असल्यामुळे तेही पर म्हणजे चेतन द्रष्टा तदर्थच म्हणजे त्याच्याकरताच आहे.

चित्त पूर्ण अंतर्मुख झाले म्हणजे त्या चित्तात आत्म्याचा विशेषपणे साक्षात्कार कसा होतो हे वरील बावीस आणि तेवीस ह्या सूत्रांत स्पष्ट झाले. आता आत्म्याचे अशा प्रकारे विशेष दर्शन झाले म्हणजे चित्ताच्या ठिकाणी कोणत्या अवस्था प्रकट होत असतात त्याचे पुढील सूत्रांतून वर्णन केलेले असून शेवटच्या म्हणजे चौतिसाव्या सूत्रात कैवल्याचे स्वरूप सांगितलेले आहे.

२५. विशेषदर्शिन आत्मभावभावनाविनिवृत्तिः ।
मी पुरूष सत्-चित्-आनंदरूप असून चित्ताहून वेगळा आहे अशा प्रकारचे वृत्त्यात्मक अनुसंधान राखणे ही आत्मभावभावना होय. ज्याला वरील प्रकारचे आत्म्याचे विशेष दर्शन झालेले असते त्याच्या ठिकाणची आत्मभावना नाहीशी होते, म्हणजे तशा प्रकारची भावना न करताही त्याच्या ठिकाणी आत्मस्फुरण सहजपणे होऊ लागते.

२६. तदा विवेकनिम्नं कैवल्यप्राग्भारं चित्तम् ।
आत्म्याचे विशेष दर्शन झाल्यामुळे  आत्मभावभावना निवृत्त झाली असता त्या योग्याच्या चित्ताचा प्रवाह कैवल्यरूपी उंच प्रदेशाकडून विवेकरूपी निम्न म्हणजे सखल प्रदेशाकडे वाहत राहतो.

२७. तच्छिद्रेषु प्रत्ययान्तराणि संस्कारेभ्यः ।
आत्मसाक्षात्कार झालेल्या योग्याच्या चित्ताच्या सात्त्विकवृत्तीप्रवाहात मधून मधून खंड पडतो, हीच छिद्रे होत. ह्या छिद्ररूप अंतरालात मधून मधून पूर्वसंस्कारांमुळे भिन्न प्रत्ययही निर्माण होतात.

२८. हानम् एषां क्लेशवदुक्तम् ।
मागील सूत्रात सांगितलेले प्रत्यय आणि त्यांचे संस्कार चित्तांतून नाहीसे होणे हे त्यांचे हान होय. हे हान साधण्यासाठी मागे क्लेशांच्या निवृत्तीसाठी जे उपाय सांगितलेले आहेत तेच ह्या ठिकाणी उक्त आहेत.

२९. प्रसंख्यानेऽप्यकुसीदस्य सर्वथाविवेकख्यातेर्धर्ममेघः समाधिः ।
यथाक्रम व्यवस्थित असलेल्या तत्त्वांहून चेतन आणि द्रष्ट्टरूप असलेला आत्मा म्हणजे आपण अत्यंत विलक्षण आहोत असे नि:संदेह ज्ञान होणे हे प्रसंख्यान होय. ह्या प्रसंख्यानाविषयीही जो योगी अकुसीद म्हणजे सावकारी न करणारा म्हणजे विरक्त होतो अशा योग्याच्या ठिकाणी प्रत्ययांतररहित अशी विवेकख्यातीरूप आत्मसाक्षात्कारवस्था प्रकट होते आणि मग ह्या विवेकख्यातीमुळे धर्मामृतधारांचा वर्षाव करणारा जणू मेघच असलेला समाधी सिद्ध होतो.

३०. ततः क्लेशकर्मनिवृत्तिः ।
धर्ममेघ समाधी सिद्ध झाला असता अविद्यादी पाच क्लेश आणि शुभ, अशुभ व मिश्र अशी त्रिविध कर्मे ह्यांची पूर्णत्त्वाने निवृत्ती होते.

३१. तदा सर्वावरणमलापेतस्य ज्ञानस्याऽनन्त्याज्ज्ञेयम् अल्पम् ।
धर्ममेघ समाधीमुळे चित्तातील ज्ञानाला आवरक असलेले जे क्लेशकर्मरूप मल, त्यांपासून मुक्त झालेल्या ज्ञानाला आनन्त्य प्राप्त होत असते आणि त्याच्या अपेक्षेने ज्ञेय अगदी अल्प उरते.

३२. ततः कृतार्थानां परिणामक्रमपरिसमाप्तिर्गुणानाम् ।
मागील सूत्रात सांगितल्याप्रमाणे योग्याच्या चित्तांतील ज्ञानाच्या ठिकाणी आनन्त्य आणि ज्ञेयाच्या ठिकाणी अल्पता आल्याने प्रकृतीचे घटक असलेले सत्त्व, रज आणि तम हे तिन्ही गुण कृतार्थ होतात आणि म्हणून त्या योग्याच्या चितांतील सूक्ष्म अस्मितेपासून स्थूलदेहापर्यंतचा जो त्रिगुणांचा परिणामक्रम, तो समाप्त होतो.

३३. क्षणप्रतियोगी परिणामापरान्तनिग्रार्ह्यः क्रमः ।
हा परिणामक्रम क्षणप्रतियोगी असतो, म्हणजे एका क्षणाहून तो विलक्षण आणि अनेक क्षणांच्या प्रचयाच्या आश्रयाने राहणारा असा असतो. हेच त्याचे क्षणप्रतियोगित्व होय. त्याचप्रमाणे तो विशिष्ट-परिणाम-प्रवाहाच्या अपरान्तापर्यंत म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत नि:शेषत्वाने ग्रहण केला जातो.

३४. पुरुषार्थशून्यानां गुणानां प्रतिप्रसवः कैवल्यं, स्वरूपप्रतिष्ठा वा चितिशक्तिरेति ।
जीवाला भोग आणि अपवर्ग ही प्राप्त करून दिल्यामुळे त्रिगुणांना आता साधावयाचा असा कोणताच अर्थ राहिलेला नसतो, ही त्यांची पुरूषार्थशून्यता होय. अशा रीतीने पुरूषार्थशून्य झालेले गुण प्रयोजनाभावी आपापल्या उपादान करणात विलीन होतात. हा त्यांचा प्रतिप्रसव होय. हीच कैवल्यावस्था होय, किंवा चितिशक्ती म्हणजे चेतनपुरूष अविद्येच्या नाशामुळे वृत्तीशी सारुप्य पावत नाही आणि अशा प्रकारे तो आपल्या नित्यसिद्ध स्वरूपाने प्रतिष्ठित असतो हीच कैवल्यावस्था होय.

॥ इति पतञ्जलि विरचिते योगसूत्रे चतुर्थः कैवल्यपादः ॥

'इति' हे पद शास्त्र समाप्त झाल्याचे निदर्शक म्हणून योजले आहे.

अशाप्रकारे हा प्रकल्प यथानियोजित संपूर्ण होत आहे.


.

२ टिप्पण्या:

Anonymous म्हणाले...

श्री नरेंद्र गोळे : तुम्हाला देवनागरीत प्रतिसाद देताना मला ज़रा भानगडी कराव्या लागतात. पहिले मी नागरीत लिहिलेलं सगळं गायब होतं. पण काहीतरी abcd लिहून Post बटन दाबलं आणि मग Edit लिंक वापरून परत आलं की, अहो आश्चर्यम्‌, नागरी लिहिता येतं. त्यामागचं तांत्रिक कारण माहीत नाही.

म्हणून मी सरळ रोमनमधेच लिहिणार होते; आणि 'Shri Narendra Gole' असं बरोबर लिहिलं, पण मग देवनागरीत येताना डोक्यात 'इंद्रवंशा' घोंघावत असल्यामुळे घोटाळा झाला आणि 'गोळे' ऐवजी 'प्रभू' लिहिल्या गेलं. ते असो. मी रोमनमधे 'a.ntarbahi: sarvat eva sarvadaa' वगैरे भरभर लिहू शकतो, पण नन्तर ते वाचताना त्रास होतो.

मला पातंजलीच्या लिखाणात रस नाही. मी 'समाधिननेन समस्तवासना' शब्द वाचले; ते चौथा वर्ण सोडून वंशस्थाशी मिळतात हे कळलं, म्हणून कुतुहल वाटून मी इंद्रवंशेचा गणक्रम पाहिला. पण इंद्रवंशा आणि वंशस्थविलातला फरक हा पहिल्या वर्णात आहे, हे कळलं. 'अन्तर्बहि: सर्वत एव सर्वदा' ही मात्र मी इंद्रवंशेतली पाहिलेली एकमेव संस्कृत ओळ; त्याबद्दल तुमचे आभार. तुम्हाला रस असल्यास: उपजाति रचनेत कुठल्या वृत्तांची ज़ोडी लावता येते याचे नियम आहेत. इंद्रवज्रा-उपेंद्रवज्रा जोडी आहे. तसंच इंद्रवंशा-वंशस्थ ज़ोडी आहे. पण विवेकचूडामणीत तर इंद्रवंशा + उपेंद्रवज्रा अशी २३ अक्षरी ओळ आहे. हा मला नवीनच प्रकार आहे. मी 'विवेकचूडामणी' काय प्रकार आहे याचा शोध घेईन. तुम्हाला माहिती मिळाल्यास मला dhananjay.naniwadekar at gmail पत्त्यावर मेलद्वारे कळवा.

रघुवंशम्‌ मधे कालिदासानी वंशस्थात बराच मज़कूर लिहिला आहे. तिथेच इंद्रवंशा छंद पण वापरला असू शकेल; पण हा एक अंदाज़ आहे, नक्की माहिती नाही.

- नानिवडेकर

नरेंद्र गोळे म्हणाले...

नानिवडेकर महोदय, नमस्कार.

आपल्या रुचीबाबत कल्पना आली. भेटून आनंद झाला.

आपण "छंदोरचना" हा माधव ज्युलियनांचा ग्रंथ वाचला आहे का? नसल्यास सुरेश भट डॉट कॉम वर पी.डी.एफ. उपलब्ध आहे ती घेऊन अवश्य वाचावा. त्यांच्या मराठीतील पी.एच.डी.चा तो थेसिस आहे. आपली जिज्ञासा तो पूर्ण करू शकेल असे वाटते.

आपला स्नेहाकांक्षू
नरेंद्र गोळे