प्रार्थना

न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं नापुनर्भवं । कामये दुःखतप्तानां‌ प्राणिनां आर्तिनाशनम्‌ ॥

न राज्य चाहूँ, न स्वर्ग चाहूँ और न चाहूँ मोक्ष, मैं तो चाहूँ, दुःखियों की पीडा होवै सभी खतम ।

नको राज्य, नको स्वर्ग, नको मोक्षही मला, दुःखितांच्या नष्ट व्हाव्या, आर्ती सार्‍या आजला.

I desire neither kingdom nor heaven nor liberation. I desire end of miseries for all the life on the earth.

२०११/११/१०

हृदयविकाराचे अवतरण

हृदयविकारास मूक, प्रगतीशील आणि प्राणघातक विकार समजतात. मूक, या अर्थाने की खूप बळावेपर्यंत त्याची स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. तो बळावत राहतो. प्रगती करत राहतो. या अर्थाने तो प्रगतीशील असतो. कधी कधी हृरूदयशूळ जाणवू लागतो. कधी कधी अचानक हृदयाघात होतो. क्वचित जीवही जातो. मग तो प्राणघातक असल्याची आपली खात्री पटते. मात्र सूप्तपणे तो प्रगतीशील असतो, तेव्हा कधी कधी अचानकच काही त्रास जाणवू लागतो आणि मग तो विकार उघड होतो. याआधी ज्यांना ज्यांना असा त्रास झाला होता, तेव्हा तो काय स्वरूपात व्यक्त झाला, हे जर आपण पाहिले, त्याची व्यवस्थित नोंद करून ठेवली, तर त्या त्या लक्षणांनी आपण सावध होऊ शकतो. समयी, त्यास प्रतिबंधही करू शकतो. यास्तव ही लक्षणे जाहीर होणे गरजेचे असते. मी स्वतः काही अशा रुग्णांशी संबंधित होतो. त्यांच्याशी बोलून त्या घटना मी नोंदवून ठेवलेल्या आहेत. त्या चार घटना इथे लोकप्रबोधनाखातर देत आहे. त्यात उल्लेखलेल्या व्यक्ती खर्‍याखुर्‍या आहेत. त्यांची, ही माहिती इथे देण्यास अनुमती आहे. त्याखातर मी त्यांचा आभारी आहे. खरे तर आपण सारेच त्यांचे ऋणी आहोत.

०४-०९-१९९२ १३३०-हृदयाघात- डॉ.अविनाश सबनीस-वय ४२ वर्षे

हृदयविकाराचा ज्ञात पूर्वेतिहास: काहीही नाही, पूर्वी माहीत असणारी लक्षणे: दोन्ही पायांच्या तळव्यांची रात्री झोपल्यावर जाणवत असणारी जळजळ. ही सकाळी उठल्यावर हालचाल केली असता किंवा गरम पाण्यात पाय सोडून बसले असता कमी होत होत नाहीशी होत असे.

जेवण झाल्यावर साधारणपणे दुपारी दीडच्या सुमारास कार्यालयात असतांनाच, पाठीवर, दोन्ही खांद्यांच्या पाठीमागच्या बाजूंना साधारणतः सहा इंच खालच्या अंगाला, कोणीतरी पाठीमागून सतत पुढे हलकेच ढकलत आहे अशी जाणीव होऊ लागली. ही जाणीव सतत तासभर होतच राहिली. सुमारे तीन वाजता संपूर्ण अंगाला हलकासा घाम फुटू लागला. त्यानंतर दहा-पंधरा मिनिटांतच अंगातल्या शक्तीचा र्‍हास होत आहे असे वाटू लागले. हातापायांना हलकासा कंप सुटू लागला. श्वासोच्छ्वास मात्र काहीही त्रास न होता सामान्यपणेच होत होता. छातीत दुःखणे अथवा जबडा किंवा खांद्याकडून हातांकडे पसरणार्‍या वेदना यांपैकी कोणतीही लक्षणे जाणवत नव्हती. सव्वातीनच्या सुमारास त्रास (सर्वांगाला घाम येणे आणि शक्तीपात) जास्तच वाढला. तेव्हा गलितगात्र झाल्याने व फारच अस्वस्थ वाटू लागल्याने डॉक्टरकडे जावेसे वाटू लागले. म्हणून सहकार्‍यांनी त्वरित कार्यायातील उपलब्ध वाहनातून, कार्यालयाच्याच शुश्रुषाकेंद्रात (डिस्पेंसरीत) हलवले. तेथील डॉक्टरांनी लगेचच सॉर्बिट्रेटची गोळी जिभेखाली ठेवली व नाकाद्वारे प्राणवायूचा पुरवठा सुरू केला. मग रुग्णवाहिकेतून शुश्रुषालयातील अतिकाळजी विभागात (आयसीसीयूमधे) हलवण्यात आले. तोपर्यंत साधारणपणे साडेचार पावणेपाच वाजलेले होते. त्यानंतर तेथे शुद्ध हरपली.

तिथल्या डॉक्टरांनी हृदयाघाताच्या आणीबाणीच्या प्रसंगी शिरेतून सुईवाटे वापरावयाच्या औषधांचा उपचार करून, हृदयाघात न व्हावा याकरता प्रयत्न सुरू केले. शुद्धीवर आणण्याचे प्रयत्नही सुरूच ठेवले होते. परंतु हृदयच बंद पडले (cardiac arrest) आणि हृदयालेख शून्यावर आला. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णाचे प्राण वाचवण्याकरता आणि हृदयस्पंदने पुन्हा सुरू करण्याकरता ४४० व्होल्टचे, एकदिक्‌ (DC) विजेचे झटके देण्याची उपचार पद्धती सुरू केली. असे तीनचार झटके दिल्यानंतरही हृदय पुन्हा सुरू होईना. त्यानंतर शेवटचा प्रयत्न म्हणून डॉक्टरांनी तसाच विजेचा झटका दिला आणि हृदयस्पंदने पुन्हा सुरू झाली. योग्य वेळेत डॉक्टरांनी वापरलेल्या आणीबाणीच्या उचित वैद्यकीय उपचारांमुळे जीव वाचला.

त्यावेळी बेशुद्ध अवस्थेत असतांना मात्र शरीर अगदी हलके हलके होऊन, जडत्व नाहीसे झाल्याचा सुखद संभ्रम होत होता. तसेच अगदी जवळ परंतु अस्पष्ट असे भजन चालू असून कुणीतरी टाळ वाजवत आहे असाही संभ्रम होत होता. काहीही होत असले तरीही ती अवस्था अगदी सुखदच वाटत होती. बरे झाल्यावर या अनुभवाच्या संदर्भातील भजनामधील टाळ वाजवण्याचा संबंध कदाचित, ४४० व्होल्टचे, एकदिक्‌ (DC) विजेचे झटके देण्याच्या विद्युत-अग्रांच्या आकारांशी, त्या अवस्थेत (ट्रान्समध्ये), मनातच जोडला गेलेला असावा.

त्यानंतर रात्री १० च्या सुमारास हलकीशी शुद्ध आल्यासारखे वाटले. शरीर हलवण्याचे तर सोडाच परंतु डोळे उघडण्याचेही त्राण राहिलेले नव्हते. अंगात अगदीच शक्ती शिल्लक राहिलेली नसल्याने, समोर असलेल्या डॉक्टरांमधील काहीतरी बोलणे अस्पष्टसे ऐकू येत होते. मात्र त्यामधले अर्थ समजण्याइतपत भान अजूनही आलेले नव्हते. अतिथकव्याने डोळ्यांच्या पापण्याही उघडवत नव्हत्या. डॉक्टरांनी ७२ तास पर्यंतचा काळ धोकादायक असल्याचे सांगितले होते. असे नंतर कळले.

१८-१२-२००६-शुक्रवार-हृदयशूळ-श्री. प्रभाकर महादेव शिवलकर-वय सुमारे ५४ वर्षे

लक्षणः सकाळी ६ वाजता ऑफिसला निघाले असता, छातीतून कळ आली. तरीही थोडे थांबून चालत चालत ऑफिसमध्ये पोहोचले. दुपारी १२॥ ते १३०० दरम्यान खांदे धरले गेले. अस्वस्थ वाटू लागले. रात्री ९-१० वाजथा अस्वस्थ वाटू लागले. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. गॅसेस झाले असतील असे वाटून त्याकरता गोळी घेऊन झोपले. पण नीट झोप लागली नाही. सकाळी डोंबिवली डिस्पेंसरीत गेले. त्यांनी ईसीजी काढला. मात्र गोळ्या ऍसिडिटीवर दिल्या. पुन्हा शनिवारी १९-१२-२००६ दुपारी जास्त त्रास व्हायला लागला. म्हणून जवळच्या डॉक्टरकडे गेले. त्यांनी ईसीजी पाहून त्याच गोळ्या घ्यायला सांगितल्या. मग बिछान्यावर पडून आराम केला. पण श्वासच घ्यायला खूप त्रास होऊ लागला.

मग शेजारच्या पॅथॉलॉजिस्टनी पुन्हा ईसीजी काढला. तो पाहून ते म्हणाले की तुम्ही कुठेतरी ऍडमिट व्हा. लक्षण चांगले नाही आहे. मग कंपनीच्या शुश्रुषालयात रूजू झाले. त्यांनी पुन्हा ईसीजी काढला. त्यांनी लाय-पुल-ऑन चे इंजेक्शन दिले. व आयसीयूमध्ये ठेवले. २१ तारखेला हिंदुजामध्ये डॉक्टर काणे यांच्याकडे अँजिओग्राफीला पाठवले. त्यात मुख्य डाव्या हृदयधमनीला ३०% अडथळा दिसून आला. शिवाय तिथे रक्ताची गुठळीही होती. ती अँजिओग्राफी प्रक्रियेत काढून टाकण्यात आली. त्यानंतर स्वस्थ वाटू लागले होते. बरे वाटू लागल्र होते.

ती पुन्हा निर्माण होऊ शकते म्हणून त्यांनी बायपास शस्त्रक्रिया करायला सांगितली. डॉक्टर कारवा यांचा दुसरा सल्ला घेतला. डॉ.यू.प्रभाकर राव, आयकॉन हॉस्पिटल यांचाही सल्ला घेतला. डॉक्टर प्रतीक्षा नामजोशी यांचाही सल्ला घेतला. मात्र डॉक्टर पेंडसेंनी, कुणीही हमी देत नसल्याने बायपास करायचा निर्णय घेतला. ३१-०१-२०७ ला डॉक्टर अरूण मेहरा, जसलोक हॉस्पिटल यांनी तिथेच बायपास सर्जरी केली. आज बीपी १४०/८० राहत आहे. कोलेस्टोरॉल नॉर्मल आहे.

३१-०३-२००८-हृदयाघात-श्री. बाळासाहेब सखाराम जगदाळे-वय सुमारे ५४ वर्षे

लक्षणः याआधी सुमारे सहा महिने जेवतेवेळी घास गिळायला कमालीचा त्रास होत असे. पाण्याच्या घोटाबरोबरच घास घ्यावा लागे. तरीही खाली उतरत नसे.

सकाळी १००० वाजता चहा पिऊन कामावर रूजू होत असता, तोल गेल्यासारखे वाटले. चक्कर आल्यासारखी वाटू लागली. मग डिस्पेंसरीत गेले. तिथे जिनाही चढता येईना. दरदरून घाम फुटला. सगळे कपडे भिजून गेले. त्यावेळी अत्यंत अशक्तपणा वाटू लागला. एक पाऊलही पुढे चालवेना. तेव्हा मग व्हिलचेअरवरून वर नेले. ईसीजी काढला. निरीक्षणाखाली ठेवायला सांगितले. मग अर्ध्या तासाने हॉस्पिटलला हलवले. तेव्हा चालत चालत जाता आले.

तिथेही आयसीयूमधे निरीक्षणार्थ ठेवले. दुसर्‍या दिवशी डॉ.व्हि.टीशाह, जसलोक यांनी तपासणी केली आणि अँजिओग्राफीकरता जसलोकला हलवण्याचा सल्ला दिला.

१-०४-२००८ रोजी संध्याकाळी जसलोकला भरती झाले. ०२-०४-२००८ रोजी अँजिओग्राफी केली. डाव्या मुख्य हृदयधमनीत ८०% अडथळा होता. तिथून अँजिओप्लास्टीकरता हॉस्पिटलला फोन करून पत्र मागवून घेतले. मात्र, अँजिओप्लास्टी त्याच ऑपरेशनदरम्यान करण्यात आली. सात दिवसांनी घरी जाण्यास सोडले. आज बीपी १३०/८० राहते. कोलेस्टेरॉल नॉर्मल आहे.

२२-१२-२००८-हृदय-झडपेचा संकोच-त्रिंबक दत्तात्रय ताम्हनकर-वय सुमारे ७२ वर्षे


त्रिंबक दत्तात्रय ताम्हनकर म्हणजेच माझे सासरे नाना. नाना २२-१२-२००८ रोजी डॉ.तुषार छेडा यांच्या कस्तुरी प्लाझा इथल्या क्लिनिकमधे, मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेकरता म्हणून रूजू झाले. डोळ्यात औषधे घालून तयारी झाली. डॉक्टर आले. ऑपरेशनला सुरूवात झाली. पण थोड्याच वेळात डॉक्टर ऑपरेशन थिएटरमधून प्रतीक्षादालनात, चिंताक्रांत अवस्थेत बाहेर आले आणि सांगू लागले की पेशंट उठून बसतोय. ऑपरेशन करताच येत नाही आहे.

“मी डोळा उघडलाय, ऑपरेशन सुरू झालय, आणि पेशंटला आडवे पडून राहता येत नाही आहे. फक्त वीस – पंचवीस मिनिटे जर ते पडून राहू शकले तर मी ऑपरेशन पूर्ण करू शकेन. पण ते आडवे होऊच शकत नाही आहेत. माझ्या आयुष्यात असे पहिल्यांदाच घडते आहे.” डॉक्टर म्हणाले.

आम्ही विचारले की आम्ही आत येऊन पेशंटला समजावून सांगू काय? तर ते आम्हाला आत येऊ द्यायला तयार नव्हते. नानांचे मेंदूचे ऑपरेशन डॉक्टर होंबाळी यांनी केलेले होते. त्यांनाही या मोतीबिंदू शस्त्रक्रियेबाबतची पूर्वसूचना दिलेलीच होती. मी विचारले की मी होंबाळींना बोलावू का? त्यालाही ते तयार नव्हते. ते म्हणाले, “मला हृदयाबाबतच काही प्रश्न असावा असे वाटते आहे. मी डॉ.कारवा यांना बोलावतोय.” लगेचच ते त्यांच्या कक्षाकडे धावले. डॉ.कारवांना फोन केला. तेही जागेवरच उपलब्ध होते. लगेचच यायला निघाले.

वस्तुत: या मोतीबिंदू शस्त्रक्रियेबाबतची पूर्वतयारी करतांना आम्ही डॉ.कारवा यांच्याच शुश्रुषालयात नानांची तपासणी करवून घेऊन, ही शस्त्रक्रिया करण्यास कुठलीच अडचण नसल्याचा अहवाल डॉ.छेडांना आणून दिलेला होताच. तरीही हे असे का होत असावे?

आम्ही सगळेच तणावाखाली आलेलो होतो. काय करावे काहीच सुचेना. मी डॉक्टर होंबाळी यांनाही लगेचच फोन करून परिस्थिती कळवली. ते कन्सल्टींग रूमवर येण्याकरता निघालेच होते. त्यांनी जाता जाता, डॉ. छेडांकडे येण्याचे कबूल केले. त्या थंड वातावरणातही मला दरदरून घाम फुटत होता.

नानांना तरूणपणीच झालेल्या एका अपघातामुळे डावा पाय गुढग्यात फारसा वाकवता येत नसल्याने ते जमिनीवर बसू शकत नसत. एकतर खुर्चीवर बसावे लागे किंवा पलंगावर आडवे. प्रोस्टेटचे ऑपरेशन झालेले असल्याने वारंवार लघवीला जावे लागे म्हणून ते फारसे घराबाहेर पडायलाही उत्सुक नसत. पुढे डिसेंबर २००५ मधे तोल जाऊ लागल्याने तसेच लघवीवरील नियंत्रण सुटल्याने मेंदूचे शंट ऑपरेशनही करावे लागलेले होते. म्हणून आता जर हे ऑपरेशन अयशस्वी झाले तर त्यांचे आयुष्य फारच परावलंबी होणार होते. हे सर्व विचार आमच्या घरच्या सगळ्यांच्याच मनात दाटून येत होते. प्रश्न हजारो होते. उत्तरेच सुचत नव्हती.

त्या दिवशी डॉ.छेडा सहा ऑपरेशन्स करणार होते. पहिले ऑपरेशन यशस्वीरीत्या पूर्ण झालेले होते. नानांचा दुसरा नंबर होता. आणखी उर्वरित चार पेशंट डोळ्यांत औषधे वगैरे घालून सज्ज होते. त्यांचे प्रत्येकी दोन दोन, चार चार नातेवाईक आपापल्या पेशंटला शारीरिक मानसिकरीत्या तयार करत होते. तेवढ्यात अचानकच ही घटना घडली. सगळे बोलणेही प्रतीक्षादालनातच घडत असल्याने तिथे उपस्थित असलेल्या सर्व तीसएक लोकांमधे धास्तीची भावना भरून राहिली. लोक आपापसात निरनिराळ्या चर्चा करत होते. पुढे काय होईल, काय होऊ शकेल याचे तर्क लढवत होते.

तेवढ्यात डॉ.कारवा एका नर्सला सोबत घेऊन आले. तिच्याजवळ ई.सी.जी. काढण्याचे यंत्र होते. लगेचच ते ऑपरेशन थिएटरमधे शिरले. नानांना सॉर्बिट्रेटची गोळी दिली गेली. ई.सी.जी. काढण्यात आला. गोळीच्या प्रभावामुळे नाना आडवे राहू शकत होते. डॉ.कारवा म्हणाले की तुम्ही डोळ्याचे ऑपरेशन पुन्हा सुरू करा. मी इथेच थांबतो, ऑपरेशन होईस्तोवर. ते थांबून राहिले. तेवढ्यात डॉक्टर होंबाळीही आले. ते ही डॉ.कारवांशी बोलले. पुढली २०-२५ मिनिटे अतिशय तणावात गेली. डॉ.छेडा आत ऑपरेशन करत होते. त्यांच्या केबिनमधे डॉ.कारवा बसलेले होते. डॉक्टर होंबाळी त्यांच्याशी बोलून त्यांच्या क्लिनिकवर रवाना झालेले होते. मग ऑपरेशन संपले नाना बाहेर आले. ऑपरेशन यशस्वी झाले होते. तरीही दरम्यानच्या काळात जवळजवळ ४०-४५ मिनिटे डोळा उघडा राहिल्याने संसर्गाची भीती होतीच. पुढे १० दिवसपर्यंत डोळ्यात संसर्गरोधक औषधे व मलमे घालायला दिली गेली. दहा दिवसांनंतर नानांना दिसू लागले तेव्हा आम्हा सगळ्यांनाच हायसे वाटले.

अशाप्रकारे डोळ्यांच्या ऑपरेशन करता टेबलवर घेताच, अचानक अस्वस्थ वाटून आडवेच न राहता येण्याचे कारण हृदयविकार हेच होते. नानांच्या हृदयाची एक झडप वयपरत्वे संकोच पावलेली असल्याने ही दुरावस्था ओढवली असल्याचे निष्पन्न झालेले होते.
.

1 टिप्पणी:

Rajeev Upadhye म्हणाले...

फारच मौल्यवान अनुभवांचे संकलन. अभिनंदन